भिवंडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष खासदार कपील पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई सुरू असल्याने भिवंडीतील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीत रंग भरला आहे. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भिवंडीत घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी हालचाली सुरू केल्या असून त्यातून वातावरण तापवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेचा मुद्दा ठरला आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी विचित्र पध्दतीने आघाडी-युती झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाºयांत संभ्रम आहे. भिवंडीत जिल्हा परिषदेचे २१ गट असल्याने अध्यक्षपद भिवंडीकडे असावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व आरपीआय सेक्युलर या राजकीय पक्षांबरोबर महाआघाडी करून भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्याने खासदार कपील पाटील यांच्यासह भाजपासोबत असलेली श्रमजीवी, रिपब्लिकन पक्ष यांना धक्का बसला आहे. भाजपाच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर शिवसेनेने शनिवारी शाखेत विशेष बैठक घेऊन व्यूहरचना सुरू केली. भाजपानेही सहकारी पक्षांसोबत राजकीय डावपेच मांडले. त्यामुळे तालुक्यातील शिवसेना विरूध्द भाजपाची लढत जोरदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शिवसेना जिल्हा परिषदेच्या २१ पैकी १८ व पंचायत समितीसाठी ४२ पैकी ३६ जागा लढवित आहे. भाजपा २१ पैकी १९ गट, पंचायत समितीचे ४२ पैकी ३८ गण, काँग्रेस नऊ गट आणि २८ गण, राष्ट्रवादी काँग्रेस तीन गट आणि दोन गण तर मनसे सहा गट आणि १३ गण लढवित आहे. मनसेशी कुणाशीही युती झाली नसल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष देवराज म्हात्रे यांनी दिली. या निवडणुकीत भाजपाविरोधात काही ठिकाणी छुपी तर काही ठिकाणी उघडपणे युती-आघाडी झाली आहे. सोमवारच्या अर्ज माघारीनंतर त्याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.काँग्रेसने केवळ राष्ट्रवादीशी आघाडी केल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे ग्रामीण विभागीय अध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. २२ वर्षे काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीत खाते उघडले नव्हते. मागील पंचायत समितीत केवळ मोतीराम चोरघे हे सदस्य निवडून आले होते. परंतु या वेळी काँग्रेसकडून तिकीट मागण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भुरे यांनी पक्ष जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या दोन जागा लढवित असून शिवसेनेबरोबर युती झाल्याचे सांगितले.शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी या निवडणुकीत पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व आरपीआय सेक्युलर यांच्याशी आघाडी केल्याचे सांगितले. राष्ट्रवादीसाठी कवाड, खारबाव, महापोली हे जिल्हा परिषद गट व म्हापोली, पायगाव व खोणी हे पंचायत समितीचे गट सोडले आहेत, तर मनसेसाठी पडघ्याचा गण, आरपीआय सेक्युलरसाठी शेलार गण सोडल्याची माहिती त्यांनी दिली.
वातावरण तापले, एकनाथ शिंदे-कपिल पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:48 PM