कल्याण : देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अद्याप प्रारंभही झालेला नाही. नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या नाट्यगृहामुळे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रांच्या दुरूस्तीचे कामही लांबणीवर पडले आहे. दरम्यान, दुरूस्तीचे काम करणाºया कंत्राटदारांना लवकरच कार्यादेश दिले जाणार असल्याने अत्रे नाट्यगृहाचे काम मार्च महिन्यात सुरू होईल आणि ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा दावा व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराच्या देखभाल, दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षातील मार्चचा मुहूर्त हुकल्यानंतर दुरूस्तीच्या कामासाठी हे रंगमंदिर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून नाट्यगृह बंदही करण्यात आले. मात्र मुख्य कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बंदची डेडलाईन सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. १ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, ही डेडलाईन देखील हुकली. दुरूस्तीच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतरही तारीख पे तारीख हा सिलसिला पुढे सुरूच राहिला. दरम्यान दुरूस्ती कामाच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने नाट्यगृहाच्या देखभाल, दुरूस्तीच्या कामाचे तीन भाग करण्यात आले. त्याप्रमाणे प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा मागवली गेली. अखेर याला प्रतिसाद मिळाला, परंतु, अद्यापही संबंधित कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. दुरूस्तीच्या कामाला होत असलेला विलंब पाहता काम सुरू करा अशा सूचना संबंधित कंत्राटदारांना प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये काम सुरू होईल, असा दावा जरी व्यवस्थापनाकडून होत असला तरी तो कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अत्रे रंगमंदिराची डागडुजी होणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:46 PM