ठाणे : मुंब्य्रातील चौदावर्षीय मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मुंब्रा-कौसा परिसरातील मोहम्मद मन्सूर आलम अन्सारी (२६) याला ठाणे जिल्हा व सत्र (विशेष पोक्सो) न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी ७ जानेवारीला दोषी ठरवून १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी काम पाहिले.
अन्सारी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या घरगुती खाणावळीत जेवण्यासाठी येत होता. २०१४ मध्ये आईची प्रकृती बिघडल्यामुळे पीडित मुलगी खाणावळ चालवत होती. याचदरम्यान त्याने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीही तो देत होता. त्यामुळे ही मुलगी भीतीपोटी हा अत्याचार सहन करत होती. मात्र, १० फेब्रुवारी २०१५ रोजी पोटात दुखत असल्याने या मुलीला कळवा रु ग्णालयात दाखल केले. त्यावेळी तपासणीत ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. तिने बाळाला जन्मही दिला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील कडू यांनी केलेला युक्तिवाद आणि साक्षीपुरावे ग्राह्यमानून आरोपीला बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरवून १० वर्षे कारावास आणि २८ हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.