मीरारोड - मीरारोड मधील ७ हजार ६३६ चौ . मी . इतका भूखंड आदिवासींचे संरक्षित कुळ असताना बनावट कागदपत्रांच्या मार्फत बळकावून त्यावर इमारती बांधून लोकांना विकणाऱ्या युनिक शांती ह्या विकासकासह एकूण ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .शांता शिनवार तारवी ह्या आदिवासी समाजातील महिलेच्या फिर्यादी वरून जमीन मालक चंद्रकांत नवलकर , प्रकाशिनी नवलकर , रश्मी नवलकर , शिल्पा तळपदे व जमीन घेणार विकासक दिलेश शाह , जितेंद्र दोषी , हर्षद दोषी, मधू दोषी, शरदचंद दोषी ह्या ९ जणांवर गेल्या वर्षी २७ ऑक्टॉबर रोजी गुन्हा दाखल झालेला होता. परंतु सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी तारवी यांनी केली होती .अखेर शुक्रवारी ह्या प्रकरणी पोलिसांनी सरकारी अभियोक्ता यांच्या अभिप्राया नुसार ह्या सर्व आरोपींवर ऍट्रॉसिटी कायद्या खाली सुद्धा गुन्हा दाखल केला आहे . ह्या प्रकरणात अजून पर्यंत एकही आरोपीला काशीमीरा पोलिसांनी अटक केलेली नाही .शांता यांचे आजोबा सोमऱ्या जाधव यांची जुना मौजे मीरे सर्वे क्र . २२६ तथा नवीन मौजे पेणकरपाडा येथील सर्वे क्र . ५८/१ मधील जमिन कसत असल्याने संरक्षित कुळ म्हणून नोंद होती . त्यांचे वारस म्हणून १९८२ मध्ये वारसदारांची नोंद केली गेली . शांता यांची आई १९८९ मध्ये मरण पावल्याने वारस म्हणून शांता सह अन्य वारसदारांची नावे लागली . सदर जमिनीचे एकूण क्षेत्र २५, ५०९ चौ. मी . असून त्यातील ७६३६ चौ . मी . इतके क्षेत्र शांता यांच्या कुटुंबियांच्या हक्कात आहे .तसे असताना २००७ साली पालिकेने सदर जमिनीवर बांधकाम परवानग्या देऊन बांधकामे सुरु झाली असल्याचे कळल्याने या प्रकरणी माहिती घेऊन तक्ररी सुरु केल्या . त्या वेळी आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे व अंगठे उमटवून खोटे हक्कसोड पत्र , विक्री करार आदी तयार केले. शांता ह्या सही करत असताना त्यांचा अंगठा करारावर असल्याचे नमूद केले . विकासक व जमीनमालक यांनी संगनमताने अन्याय व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता .
आदिवासींची जमीन बळकावणाऱ्या बड्या विकासकासह ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 6:42 PM