बदलापूर: बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज संतप्त बदलापूरकरांनी शाळा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. राजकारण्याची मदत न घेता बदलापूरकरांनी या अत्याचारा विरोधात रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवली. बदलापुरात गेल्या आठवड्यात आदर्श महाविद्यालयातील एका सफाई कर्मचाऱ्यांनी दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोबत अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असली तरी शाळा प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदारपणा पालकांना असाह्य झाल्याने आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन निदर्शने करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. या निर्णयाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी सात वाजता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हजारो पालकांनी एकजूट होत निदर्शने केली. केवळ सोशल मीडियावर आंदोलनाचा निरोप पाठवून बदलापूरकरांना एकजूट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार शेकडो पालकांनी या अत्याचार विरोधात आपली दाखवलेली एकजूट ही पोलीस प्रशासनाला आणि शाळा प्रशासनाला घाम फोडणारी ठरली. असंख्य पालकांचा अनावर झालेला संताप पाहून त्यांना शांत करण्यात पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली.
या आंदोलनात महिला पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर तरुण मंडळी देखील या आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचाराच्या विरोधात बदलापूरकरांनी दाखवलेली एकजूट पाहून आता राजकारणी देखील धास्तावले आहेत. अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच बड्या राजकीय पुढार्यांना उशिरा जाग आल्यामुळे बदलापूरकरांनीच पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी केलंय.