सदानंद नाईक, उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपीं बाबासाहेब सोनावणे याने सोमवारी दुपारी पोलीस कॉन्टेबल कृष्णकांत सोंगाळ यांच्यावर स्टील स्टूलने केल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यात या आरोपीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपायावर ब्लेडने हमला केला होता.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या बाबासाहेब सोनावणे यांने महिला शिपाई यांच्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले होते. या गुन्हात अटक असलेल्या बाबासाहेब सोनावणे यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२ वाजता पोलीस कॉन्टेबल कृष्णकांत मारुती सोंगाळ हे आरोपी सोनावणे याला डिस्चार्ज मिळत असल्याने, मेडिकल मेमो लिहित होते. त्यावेळी पोलीस शिपाई सुनील मगरे यांच्या सोबत स्वच्छतागृहातून आलेल्या बाबासाहेब सोनावणे याने माझ्या मयताचे प्रमाणपत्र लिहिता का? असा प्रश्न सोंगाळ यांना करून स्टीलचा स्टूल त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकाराने मध्यवर्ती रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता.
आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस कॉन्टेबल कृष्णकांत सोंगाळ यांच्या तक्रारीवरून आरोपी बाबासाहेब सोनावणे यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा करणे, मारहाण करून जखमी करणे आदी गुन्हे दाखल झाले. याप्रकाराने पोलीस दलात खळबळ उडून माथेफिरू बाबासाहेब सोनावणे यांची चौकशी करून सक्त कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.