ठाणे : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या एका अधिकाऱ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नौपाड्यात घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात विनय राऊत याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अतिक्रमण हटवून पालिकेने ताब्यात घेतलेल्या मुंब्रा येथील भूखंडाची पाहणी करणारे अभियंता अरविंद गोसावी यांच्यावर भूमाफियांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना कळवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ठाणे रेल्वे स्थानकासमोरील गावदेवी मंदिराजवळील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी नौपाडा प्रभाग समितीचे अधिकारी दयाराम पाडवी (४७) आणि त्यांचे सहकारी राजेश पाटील, शंकर जाधव, अनिल रोकडे, मदन गांगुर्डे गेले होते. त्या वेळी विनय राऊत याने त्यांना धक्काबुक्की करून, धमकी देत मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. पाडवी यांच्या तक्रारीवरून सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, मारहाण आणि धमकी या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. विनय पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
पालिका अधिकाऱ्यांवर दोन ठिकाणी हल्ले
By admin | Published: October 22, 2016 3:37 AM