कल्याण : एकीकडे वाहनचोरी, घरफोडी, जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यांचे सत्र सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकारही वाढले आहेत. याला विरोध करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना पूर्वेकडील महात्मा फुलेनगरमध्ये मंगळवारी घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
कल्याण पूर्वेतील महात्मा फुलेनगरमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे हे मनसेचे माजी शाखा अध्यक्षही आहेत. मंगळवारी रात्री १०च्या सुमारास ते त्यांच्या परिसरात फेरफटका मारीत असताना एका ठिकाणी दोघे तरुण नशा करताना त्यांना आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर सुरू असलेल्या या गैरकृत्याबाबत वाघमारे यांनी दोघांना हटकले. याचा राग आल्याने दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी लोखंडी हत्याराने वाघमारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला; परंतु वाघमारे यांनी स्वत:चा कसाबसा बचाव केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. वाघमारे यांनी प्रतिकार करताच दोघांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी मात्र याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने वाघमारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. महात्मा फुलेनगरमध्ये उघड्यावर नशाबाजी सुरू असते. पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.
-------------------------