ठाणे : एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकांकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज प्रसाद याच्यासह पाच जणांच्या टोळक्याला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिली. या पाचही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाड्यातील वीर सावरकर मार्गावरील ‘एक्सेल कॉमर्स क्लासेस येथे २८ एप्रिल २०१८ रोजी आल्विन परवेज (३९, रा. ब्रह्मांड, घोडबंदर रोड, ठाणे) या शिक्षकाला मनोजकुमार प्रसाद (रा. वाहतूकनगर अंधेरी, मुंबई), मयूर राणे (रा. वाघबीळ, ठाणे), मिथिलेश मुखिया (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई), सुरज पवार (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई) आणि मोहीत वर्मा (रा. वाहतूकनगर, अंधेरी) यांनी आपण एसीबीचे अधिकारी असून तुमच्याकडे रेड पडणार असल्याची बतावणी केली. ‘आमचे साहेब खाली गाडीत थांबले आहेत. तुम्ही खाली चला ’, असे त्यांना धमकावले. आल्विन यांनी त्यांच्यासोबत जाण्यास विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्यापैकी काहींनी त्यांना मारहाणही केली. तेव्हा तिथे सीसीटीव्हीमध्ये चित्रण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या टोळीने तिथून पलायन केले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, भागवत थविल, गोविंद पाटील, महेश भोसले आणि कॉन्स्टेबल गोरख पाटील आदींनी २७ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आधी मोहित वर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उर्वरित मनोजकुमार प्रसाद याच्यासह चौघांना अटक केली. या शिक्षकाला एका वाहनातून नेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा या टोळीची योजना होती, असेही तपासात उघड होत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मात्र, यातील सर्व बाजू तपासण्यात येत असल्याचे उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.चौकटआरोपींच्या सहकारी महिलेचा कांगावादरम्यान, संबंधित शिक्षकासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये काही दिवस राहणाऱ्या एका महिलेने मात्र या शिक्षकाने आपल्याशी ‘संबंध’ ठेवून आपली फसवणूक केल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी ही योजना आखल्याचा दावाही केला आहे. तसेच त्याचे अनेक मुलींशी संबंध आल्याचाही तिने आरोप केला. मात्र, अशी कोणतीही त्याच्याविरुद्ध तक्रार आलेली नसल्याचे तसेच अनेकींना त्याने फसवले असते, तर कोणीतरी तक्रार केली असती. तसे असेल तर अशा पीडित मुलींनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले आहे. संबंधित महिला आणि अटक आरोपी हे एकमेकांच्या परिचित असल्याचेही उघड झाले आहे.
एसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यात लुटमारीचा प्रयत्न: टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 8:18 PM
ठाण्यातील खासगी क्लासेसच्या शिक्षकाला एका वाहनातून नेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याच्या बेतात असलेल्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी छडा लावला आहे. त्यांच्याकडून ही कारही जप्त करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केला तपासशिक्षकाने फसवणूक केल्याचा महिलेचा कांगावाआरोपींना मुंबई ठाण्यातून अटक