लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कॅम्प नं. ४ लालचक्की परिसरातील मुथुट फायनान्सवरील दरोड्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला असून, सात दरोडेखोरांना अटक करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, गॅसकटर, आदी साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुथुट फायनान्स कार्यालयातून मोठे घबाड हाती लागेल या आशेतून मुथुट फायनान्स शेजारील गाळा काही जणांनी भाड्याने घेऊन तेथे फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुकानाची व मुथुट फायनान्स कार्यालयाची एकच भिंत आहे. शनिवारी रात्री १२ नंतर फळांच्या दुकानात काही जणांच्या संशयास्पद हालचाली होत होत्या. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची गस्त घालणारी गाडी गेली. त्यावेळी त्यांनी दुकानात होत असलेल्या संशयास्पद हालचाली टिपून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या दुकानाचा अंदाज घेऊन पोलिसांनी आतमध्ये असलेल्यांना बाहेर येण्यास सांगितले.
पोलिसांनी आपल्याला घेरल्याचा अंदाज आलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने दुकानाचे शटर उघडले. पोलिसांनी जहीर अहमद, इमामुद्दीन कासीम शेख, जिजाऊ शेख, रामसिंग, काळू शेख, आदिम शेख अशा सातजणांना अटक केली. सर्व दरोडेखोर झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळ येथील आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, गॅसकटर, ऑक्सिजन गॅस सिलिंडर, हातोडे, आदी साहित्य जप्त केले. सर्व सराईत गुन्हेगार असून, देशाच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुथुट फायनान्स व फळाच्या दुकानाची भिंत एकच असल्याने चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर भगदाड पाडत असल्याचे उघड झाले.
मोठी माहिती मिळण्याची शक्यताविठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी देशात कुठे कुठे दरोडा टाकला याची माहिती घेतली जात असून, मोठी माहिती उघड करण्यात पोलिसांना यश येईल, असा माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. टी. टेळे यांनी दिली.