- लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : खोट्या बंदुकीचा धाक दाखवत उल्हासनगरातील सेंट्रल बँक लुटण्याचा प्रयत्न मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे फसला. त्यामुळे चिडलेल्या चोरट्याने बँकेला बाहेरून कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. नंतर त्यांची सुटका झाल्यावर रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.उल्हासनगरच्या कॅम्प दोनमधील वुडलँड इमारतीत सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाचे कार्यालय आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बँकेचे कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत असतांना, हेल्मेटधारी तरूण हातात बंदूक घेत बँकेत घुसला. त्यांने बंदूकीचा धाक दाखवित बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या ओरडण्याने तरूण बिथरला. त्याने धाक दाखवत तेथून बाहेर जात बँकेला बाहेरून कुलूप लावले आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले आणि तो पळून गेला. त्यानंतरही कर्मचाऱ्यानी आरडाओरडा सुरूच ठेवला. त्यामुळे शेजारचे दुकानदार आणि नागरिक बँक मदतीला धावले. त्यांनी कुलूप तोडून त्यांना बाहेर काढले.बँकेचे व्यवस्थापक संजयकुमार बाबुप्रसाद यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तरूणाचा शोध सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने तरूणाचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. उल्हासनगरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. मोबाईल आणि मोटारसायकल चोरीच्या दररोज दोन ते तीन घटना घडत आहेत. मंगळसूत्र, सोन्याची चेन खेचून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. त्यातच बँक लुटण्याच्या घटनेची भर पडली आहे.
उल्हासनगरात तरूणाचा बँक लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 15, 2017 3:02 AM