ठाणे : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मन्सुरी याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा बुधवारी प्रयत्न केला. ठाणेनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुंब्र्याच्या ठाकूरपाडा भागात मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मन्सुरीने खेळणी देण्याचे आमिष दाखवून घरी नेले.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते. याप्रकरणी मन्सूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्याची १६ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. त्यावेळी आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्जिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मन्सूर याच्यावर चप्पल उगारली. त्याला मारहाणीचा प्रयत्न केला. त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अटकाव केला.
दिसेल तेथे आम्ही ‘प्रसाद’ देऊ
मृत पावलेल्या चिमुरडीची जात - धर्म शोधून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, आपल्या मते ती एक मुलगी होती. माझी छोटी बहीण होती. एवढेच महत्त्वाचे आहे. अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल, असे काम करायला हवे.
या नराधमाला मी चोप देण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मन्सूरचा खटला जलदगती न्यायालयात चालविला नाही अन् तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही पुन्हा त्याला प्रसाद देऊ. त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही मर्जिया यांनी दिला आहे.