अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये चार आरोपींनी एका कार चालकाला शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलिसाला या गाडीवर संशय आल्याने त्याने अंबरनाथच्या मटका चौकात ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने त्या पोलिसावर हल्ला केला. बाळू चव्हाण असे या पोलिसाचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
या चारही आरोपींनी बाळू चव्हाण यांच्या डोक्यात तलवारीने वार केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास, आरोपी दिलखुश महेंद्र प्रताप सिंग, अंकुश महेंद्र प्रताप सिंग, युवराज नवनाथ पवार आणि आबिद अहमद शेख यांनी मध्यवर्ती पोलीस स्थानकाच्या हद्दीत त्यांच्याकडील रिक्षा सोडून एका गाडीचा बळजबरीने ताबा घेतला. गाडीमालकाला शस्त्रांचा धाक दाखवून, त्याला अंबरनाथ रोडने पुढे घेऊन जात असताना, मध्यवर्ती पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू चव्हाण यांना त्यांच्या हालचालींसंदर्भात संशय आला, म्हणून त्यांनी मटका चौकामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आरोपींना रोखले. यानंतर, आरोपींनी पोलीस अंमलदार बाळू चव्हाण यांच्यावर हल्ला केला.
संबंधित आरोपींना मध्यवर्ती आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. यापूर्वी या आरोपींनी, हिललाईन पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका ऑफिस, तसेच विठ्ठलवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत गंगाधर भोसले यांच्या घरासमोरील गाडीसुद्धा फोडली आहे. यासंदर्भात त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संर्वांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.