ठाणे: पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आलोक रामप्रसाद वर्मा (२०) यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांवर लोखंडी रॉडने खूनी हल्ला केल्याची घटना आझादनगर क्रमांक एक परिसरात घडली. याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती राबोडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी रविवारी दिली.
आझादनगर क्रमांक एक येथील रहिवाशी आलोक वर्मा तसेच त्यांचे मित्र अमर रावत आणि मनोज रावत हे ७ ऑक्टाेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आझादनगर क्रमांक एक, राबोडीतील सद्गुरु अपार्टमेंटच्या गल्लीत बोलत उभे होते. त्याचवेळी त्याठिकाणी सुरज मिश्रा उर्फ बच्ची आणि त्याच्या तीन साथीदारांनी येउन जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपसांत संगनमताने आलोक आणि त्यांच्या मित्रांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच आलोक यांच्या पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आलोक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.