कल्याण : केडीएमटी उपक्रमातील गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्याने येथील बस आणि अन्य साहित्यांची सुरक्षा धोक्यात आली असताना सोमवारी येथे चोरीचा प्रकार घडला. दोघा चोरट्यांनी आगारातील वर्कशॉपमध्ये घुसून गिअर बॉक्स चोरण्याचा प्रयत्न केला; परंतु आगारातील सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधनामुळे चोरट्यांचा प्रयत्न हाणून पडला. सुरक्षारक्षकांनी दोघांना पकडून महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दोघेही चोरटे अल्पवयीन आहेत. आगाराला पाठीमागील वालधुनी नदीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. त्याचा फायदा उठवीत चोरट्यांनी दुपारी २ च्या सुमारास आगारात प्रवेश केला. तेथील कार्यशाळा यार्डमध्ये बस दुरुस्तीसाठी उभी होती. तिचा गीअर बॉक्स खोलून ठेवण्यात आला होता. हा गीअर बॉक्स चोरण्याचा दोघांनी प्रयत्न केला; परंतु गस्तीवर असलेले प्रभारी सुरक्षा अधिकारी भारत सांगळे, सुरक्षारक्षक बाळू राणे आणि अशोक पकाळे यांच्या ही बाब निदर्शनास पडली. तात्काळ त्यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना पकडले आणि महात्मा फुले चौक पोलिसांच्या हवाली केले. दोघेही चोरटे गणेशघाट आगारापासून काही अंतरावर असलेल्या शहाड ब्रीजच्या परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकारामुळे आगाराची सुरक्षा धोक्यात आली आहे.
आता तरी जाग येणार का?
२०१९ च्या जुलै आणि ऑगस्टच्या पूरपरिस्थितीत आगारातील ३० फूट उंच असलेल्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले. तर त्यावेळी आगारातीलच अन्य ठिकाणची १०० फूट लांब असलेली संरक्षक भिंतही कोसळली. या दोन्ही भिंती अद्याप बांधलेल्या नाहीत. यंदाही येथील संरक्षक भिंत पडल्याने आगारातील सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. १७ मेच्या तौक्ते चक्रीवादळाचाही आगाराला चांगलाच तडाखा बसला. कार्यालयांवरील तसेच रॅम्पवरील जुने सिमेंटचे पत्रे वादळात उडून गेल्याने ताडपत्रीचा आधार घेतला आहे. आगारातील एकूणच चित्र पाहता कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. दरम्यान, सोमवारच्या घटनेनंतर तरी मनपा प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल आहे.
...पण कृती शून्य
आगाराच्या दुरुस्तीची फाइल आर्थिक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडून मनपा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे केडीएमटी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. संरक्षक भिंत कोसळल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची बैठकही झाली. यात आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत; परंतु ठोस कृती झालेली नाही. यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
-----------