शनिवारी सकाळी अंबरनाथ पूर्वेतील मैत्रेय बुद्धविहारासमोर असलेल्या पावसाळ्याचे पाणी वाहून नेणारा नाला जेसीबी मशीनच्या साह्याने खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्या कामाला विरोध दर्शविला आहे. नगरपालिकेचे अधिकारी सुनील जाधव हे घटनास्थळी आले व त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी या नाल्याला नैसर्गिक प्रवाह बदलण्याची गरज काय? भरपावसात हे काम सुरू केले व याबाबत राहुल सोसायटी, पुनर्जीवन सोसायटी, एक्ससर्व्हिसमन सोसायटी, गोसावी सोसायटी, संघमित्रा सोसायटी तसेच मैत्रेय बुद्धविहार कमिटी यांच्यासोबत चर्चा का केली नाही? हा भाग सखल भागात असल्याने शेकडो रहिवाशांना व बुद्धविहाराला पुराच्या पाण्याचा धोका असल्याचे सांगितले.
बी कॅबिनच्या मुख्य नाल्यात नालेसफाईअभावी मोठी झाडे उगवली आहेत. तसेच गाळ व कचरा जमा झाला आहे. नाल्याच्या मुखाजवळ पाइपलाइन आडव्या गेल्याने प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे मात्र, ही महत्त्वाची कामे सोडून नगरपालिका अनियोजित पद्धतीने नाल्याचा प्रवाह बदलून पावसाळ्यात आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाल्याचा प्रवाह बदलण्याचा अनेकदा प्रयत्न एका स्थानिक नेत्याने नगरपालिकेवर दबाव आणून केला आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध करून हे काम बंद पाडले आहे. यंदाही तोच प्रकार घडला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
प्रतिक्रिया
नाल्याच्या संदर्भात मी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. याबाबत अहवाल नगरपालिका प्रशासनाला पाठविण्यात येईल.
- सुनील जाधव, अधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
-------------------