सत्ताधाऱ्यांकडून न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न; विलासरावजी औताडे यांचा आरोप
By अजित मांडके | Published: March 5, 2024 05:28 PM2024-03-05T17:28:29+5:302024-03-05T17:29:45+5:30
ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा १६ मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यानी या प्रसंगी दिली.
अजित मांडके ,ठाणे : काॅग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांनी केला. ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा १६ मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यानी या प्रसंगी दिली.
ठाणे शहर (जिल्हा) सेवादल अध्यक्षपदी रविंद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शेखर पाटील, शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सागितले की रविंद्र कोळी यांच्या सारख्या अनुभवी कार्यकर्त्यांवर सेवादल काॅग्रेस ची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी आली असून याचा प्रत्यय लवकरच आपल्या समोर दिसेल असे सांगितले या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्ये सहभागी झाले होते.