कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नसली तरी, पश्चिमेकडील मल्हारनगरमधील नवजीवन विद्यामंदिरच्या पटांगणात शनिवारी पार पडलेल्या एका लग्न साेहळ्यास तब्बल ५०० ते ६०० पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक वर-वधू पित्यांसह शाळेचे पटांगण लग्नासाठी देणाऱ्या मुख्याध्यापकावर येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पश्चिमेकडील संतोषीमाता रोड परिसरात राहणारे सुभाष गोरे यांच्या दोन मुलींचा लग्न सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. दोघींचे वर हे टिटवाळा आणि कल्याण येथील राहणारे आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्तात्रेय देसाई आणि पोलीस हवालदार सी.वाय. चव्हाण हे दोघे गस्त घालत असताना त्यांना लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास आली. मोकळ्या जागा, लॉन्स, विनावातानुकूलित हॉल याठिकाणी ५० व्यक्तींनाच हजर राहता येईल, असा नियम असताना त्याठिकाणी ६०० च्या आसपास पाहुणे आढळून आले. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्यासाठी पोलीस परवानगीदेखील घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले. अखेर, लग्नाचे आयोजन करणारे वधूचे पिता सुभाष गोरे, वराचे पिता पंडित धुमाळ, अन्य एका वराचा भाऊ प्रीतेश म्हात्रे यांच्यासह नवजीवन शाळेचे मुख्याध्यापक आर.टी. पाटील अशा चौघांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
-------------