भाजपाच्या मेळाव्याकडे लक्ष; अन्य पक्षांत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:36 AM2018-10-29T00:36:49+5:302018-10-29T00:37:25+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे बुधवारी पक्षप्रवेश मेळावा होणार आहे.
उल्हासनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे बुधवारी पक्षप्रवेश मेळावा होणार आहे. काँग्रेस, शिवसेना, साई, रिपाइंसह अन्य पक्षांतील दिग्गज भाजपात प्रवेश करण्याचे संकेत प्रदेश सचिव प्रकाश माखिजा यांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र, आघाडीतील वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याने सत्तेचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीच्यावेळी साई पक्षातील एक गट फुटून शिवसेनेला मिळाला होता. मात्र, ऐनवेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची खेळी यशस्वी झाल्याने महापौरपदी पंचम कलानी विराजमान झाल्या आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी भाजपातर्फे पक्षप्रवेश मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा धसका इतर पक्षांनी घेतला असून नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गोंजारण्याचे काम त्यात्या राजकीय पक्षांनी सुरू केले आहे.
माखिजा यांच्यावर मेळाव्याची जबाबदारी सोपवली आहे. इतर पक्षांतील दिग्गज गळ्याला लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सर्व नीतीचा अवलंब केला जाणार आहे. साई पक्षाच्या पदाधिकाºयांसह शिवसेना, रिपाइं, काँगे्रस पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक पक्षात प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्ता आणेल, असा दावा केला आहे.
ओमी टीमला उत्तर देण्याचा प्रयत्न
ओमी टीमचा बुधवारी कार्यकर्ता मेळावा झाला. यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करून भाजपापुढे आव्हान उभे केले. तसेच विधानसभा निवडणुकीत ओमी टीमचा उमेदवार रिंगणात असेल, असे स्पष्ट केले. या प्रकाराने भाजपात खळबळ उडाली. त्यांनी लगेच हा मेळावा घेत ओमी टीमला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.