ठाणे : यंदा कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडण्यावर ठाणे महापालिकेने बंदी आणलेली असताना लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फटाका चॉकलेट बाजारात आले आहेत. फटाक्यांचे विविध प्रकार चॉकलेटमध्ये बनविण्यात आले असून त्यांना मोठी मागणी आहे. गिफ्ट म्हणून देण्यासाठी त्याला पसंती दिली जात आहे.
दिवाळीनिमित्त फटाक्यांची दुकाने सजलेली आहेत. यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाकेविक्रीवर बंदी नसली, तरी ते वाजविण्यावर बंदी असल्याचे महापालिकेने सांगितले. कोरोनामुळे वायुप्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजविण्याचे मेसेजही व्हाॅट्सॲपवर फिरत आहेत.
मुलांना फटाके आणि चॉकलेट आवडीचे असल्याने फटाका चॉकलेट ही संकल्पना बाजारात आली आहे. तन्वी पांगारे यांची ही संकल्पना असून त्यांनी फटाक्यांच्या विविध प्रकारचे चॉकलेट बनविले आहेत. हे चॉकलेट गिफ्ट्स म्हणून देण्यासाठीही पसंती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांना अनेक पर्याय
रॉकेट, भुईचक्र, पाऊस, लक्ष्मीबॉम्ब, रश्शीबॉम्ब, लवंगीबार हे फटाक्यांचे विविध प्रकार, तसेच कंदीलही फटाका चॉकलेटमध्ये पाहायला मिळत आहे. १५० रुपयांचा बॉक्स असून त्यात डार्क आणि मिल्क चॉकलेट, २५० रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेट, तर ३५० रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेट आदी प्रकार आहेत.