डोंबिवली: कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवात विदुषी पद्मा तळवलकर यांचे गायन आणि पं. निलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सावित्रीबाई फुले नाटय़गृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काल रात्री या महोत्सवाचे चौथे आणि शेवटचे पुष्प पद्मा तळवलकर आणि पं. निलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने गुंफले गेले. या महोत्सवाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. रागसमयचक्र या स्मरणिकेचे प्रकाशन पद्मा तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रत तळवलकर यांनी भूप रागाने कार्यक्रमाची सुरूवात केली. ग्वाल्हेर, किराणा व जयपूर या तीन घराण्यांचा त्रिवेणी संगम तळवलकर यांच्या गायनातून प्रतित होत होता. आलाप, तानावरील हुकमत नजाकत यामुळे मैफील उत्तरोत्तर रंगत गेली. केदार राग त्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भजन त्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवाहची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या दुस:या सत्रत पं. कार्तीककुमार यांचे सुपुत्र निलाद्रीकुमार यांनी सतारवादन केले. त्यांना घराण्यातूनच हे संस्कार मिळाल्याचे त्यांच्या वादनातून जाणवत होते. सतारीवर फि रणारी त्यांची बोटे अचंबित करणारी होती. त्यांच्या सतारवादनाला प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्य़ा वाजवून दाद दिली. निलाद्रीकुमार यांनी प्रथम जोग आलाप, जोड त्यानंतर बंदिश सादर केली. कामोद व नट यांच्या मिश्ररागातील तिलक रागातील रचना ऐकताना मन हरवून गेले होते. मैफील संपली असतानाच श्रोत्यांच्या आग्रहखातर निलाद्रीकुमार व विजय घाटे यांनी भैरवीची धून सादर केली. ही धून मनात साठवून प्रेक्षक घरी परतले.
देवगंधर्व महोत्सवात रसिकांनी, अनुभवला संगीताचा त्रिवेणी संगम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 6:20 PM