डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी ३ वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिरात झालेल्या स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या प्रसिद्धीत आयोजक कमी पडल्याची खंत कार्यक्रम सादर करणाऱ्या स्थानिक संस्थांनी व्यक्त केली.संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात स्थानिक १९ संस्थांनी कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी आबासाहेब पटवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, साहित्यिक श्रीनिवास आठल्ये आणि कवी शुक्राचार्य गायकवाड उपस्थित होते. मात्र, एकही प्रेक्षक उपस्थितीत नव्हता. कार्यक्रम सादर करणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या संस्थांचे पदाधिकारीच प्रेक्षक बनले होते. याबाबत सहभागी संस्थांचे प्रतिनिधी म्हणाले की, आगरी यूथ फोरमने संमेलनाच्या पूर्व संध्येच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली नाही. आयोजकांनी शहरात किमान रिक्षा फिरवून जागृती करायला हवी होती. तसे केले असते तरी प्रेक्षक कार्यक्रमाला आले असते. (प्रतिनिधी)एकापेक्षा एक कार्यक्रमया कार्यक्रमाची ‘संपन्नाले नव्वदावे साहित्य संमेलन’ या संमेलन गीताने झाली. या गीतांवर डोंबिवलीतील कथ्थक नृत्य गुरूंनी आपले सादरीकरण केले. ‘नटश्री नृत्यालया’तर्फे सुखकर्ता दुखकर्ता ही गणेशवंदना , रसिका फडके यांनी नांदी गीत सादर केले. ‘श्री कला संस्कार’तर्फे गोंधळ, पुरस्कार नृत्य अकादमीने घुमर नृत्य, साक्षी घारे यांनी ‘पतित पावन’, मानसी नाईक यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’, शामिका केळकर यांनी ‘हृदयात गुंफुनी’ गीत सादर केले. टिळकनगर शाळेने ‘इंद्रायणी काठी,’ ओमकार स्कूल ‘मन मंदिरा’, विलास सुतावणे यांनी कथाकथन (श.ना.नवरे), नृत्य प्रिया गु्रपने ‘कृष्ण वंदे जगद्गुरू,’ यशराज कला मंचने मिलाऊ नृत्य, डॉ. वसंत भूमकर यांनी कथाकथन ‘दुख नावाची कथा’ (पु. भा. भावे कथाकथन),ओंकार स्कूलने दशावतार, सरस्वती विद्यामंदिर (रेल चाइल्ड) यांनी ‘मराठी शाळा वाचवा’ यावर पथनाट्य सादर केले. टिळकनगर विद्यामंदिराने टिपणी नृत्य, नटश्री नृत्यालयाने जोगवा सादर केला.
पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ
By admin | Published: February 03, 2017 3:14 AM