डोंबिवली : कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असल्याने रिक्षाचालकांना राज्य शासनाने १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी आरटीओद्वारे माहिती संकलनाचे काम सुरू आहे. त्याखेरीज अन्य कोणत्याही रिक्षा संघटना, युनियननी ही माहिती गोळा करू नये, अशा आदेशाचे पत्र राज्य परिवहन आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी काढले आहे.
सर्व नोंदणीकृत रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांना या आदेशाची प्रत देण्यात आली आहे. त्यानुसार आगामी काळात कोणीही व्यक्तिगत फॉर्मचे वाटप करून माहिती संकलित करू नये. याबाबत काही ठिकाणांहून तक्रारी आल्या असल्याने त्याची नोंद घेऊन आदेश काढण्यात आल्याची माहिती रिक्षा चालक - मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी दिली. ते म्हणाले की, डोंबिवलीतही काही रिक्षाचालकांकडून फॉर्म भरून घेण्यात आल्याची माहिती उघड झाली होती. त्यावर आक्षेप घेतल्यावर ते बंद झाल्याचे निदर्शनास आले.
--------------------