ठाणो : जिल्ह्यात बहुतांशी शहरांसह गावपाड्यांत शुक्रवारी पावसाची रिपरिप सारखी सुरू होती. या दरम्यान जिल्ह्यात सरासरी १७.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. या दरम्यान जिल्ह्यात कोठेही वित्तीय व जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात सकाळपासून कमी-अधिक पाऊस पडत आहे. ठाणे शहरात दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान पाऊस पडला असता बाजारपेठेतील ग्राहकांची एकच धांदल उडाली. शुक्रवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी-अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये ठाणे शहर परिसरात सरासरी ९ मिमी, तर कल्याणला १२.७, मुरबाडला ७ मिमी, भिवंडीला ३२ मिमी., शहापूरला ३० मिमी., उल्हासनगरला २२ मिमी. आणि अंबरनाथला १३ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.