ठाणे : ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असतानाही सत्ताधारी शिवसेनेला वाहतूककोंडी सोडवता आली नाही. त्याचा फटका मंगळवारी त्यांचेच नेते उद्धव ठाकरे यांना बसला. यामुळे ते यावर बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी साधा ब्र सुद्धा उच्चारला नाही, त्यामुळे मी तमाम ठाणेकरांसह त्यांचीही सत्ताधाऱ्यांच्या वतीने जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली.मंगळवारी ठाण्यात ठाकरे यांची सभा झाल्यानंतर बुधवारी आव्हाडांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. उद्धव यांना ठाण्यात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर झाला. कारण, त्यांना शीळफाटा येथील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बाळासाहेबांचे पुत्र असतानाही त्यांनी याबाबत जराही चक्कार शब्द काढला नाही. त्यामुळे आता त्यांनाच कळून चुकले असेल की, आपली ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असूनही आपण काय केले. ठाणे ते घोडबंदर या प्रवासासाठी एक ते दीड तास खर्च होतो, तर शीळफाटा ते ठाणे या प्रवासात दोन ते अडीच तास वाया जातात. परंतु, यावर उपाय करण्याऐवजी उद्धव यांनी आपले तोंड बंद ठेवण्याचे काम केले. त्यामुळे ठाणेकरांचे जे काही हाल होत आहेत, त्यासाठी मी त्यांच्यासह ठाणेकरांची जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.तसेच ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचेसुद्धा त्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे. परंतु, आता हा ठाणेकर आपल्या अशा आश्वासनांना भुलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सैनिकांच्या शौर्यावर आपण केव्हाही शंका उपस्थित केली नाही. उलट, उद्धव यांनीच चौकीदारावर संशय व्यक्त केल्याचे आव्हाड म्हणाले. ठाणेकरांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.नको तिथे उधळपट्टीपाण्याचे नियोजन कोलमडून पडले आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी साधे धरण ठाणेकरांना देऊ केले नाही. याउलट, नको त्या प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आव्हाडांनी मागितली ठाणेकरांची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:28 AM