- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक या दरम्यानच्या स्कायवॉकचे कार्यादेश महिनाभरापूर्वी दिले गेले, तर निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करून आव्हाडांनी मतदारांना मूर्ख बनवण्याचे काम का केले, असा प्रतिटोला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी लगावला आहे.विटावा स्कायवॉकचे फुकटचे श्रेय घेणारे आणि शिवसेनेची अक्कल गुडघ्यात आहे का, असा वायफळ प्रश्न विचारणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टरबॉय आमदार आव्हाड यांनी मतदारांची अक्कल गुडघ्यात असल्याचे मानून त्यांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याची कबुलीच दिली आहे, असे लांडगे म्हणाले. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१४ साली केल्यानंतर काही परवानग्या रखडल्यामुळे आपण पाठपुरावा करून या परवानग्या मिळवून दिल्याचा दावा आव्हाड यांनी शनिवारी केला. त्यामुळे परवानग्या मिळाल्या नसताना आणि कार्यादेश प्राप्त झालेले नसतानाही निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्पाचे भूमिपूजन करून जनतेला निव्वळ मूर्ख बनवण्याचाच उद्योग केल्याची कबुलीच आव्हाड यांनी दिली आहे, असे म्हणाले. दुसऱ्यांनी केलेल्या कामांची भूमिपूजन करण्याची सवय आणि गरज पालकमंत्र्यांना नाही. उलट, शिवसेनेने कळवा-मुंब्य्रात केलेल्या विकासकामांचे श्रेय केवळ पोस्टरबाजी करून घेणारे पोस्टरबॉय अशीच जनतेत आव्हाडांची ओळख आहे, असा टोला त्यांनी लगावला.