ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा ‘युती’वर मात करण्यासाठी आघाडी केल्याची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत केली असली, तरी आठ जागांवर अजूनही घोडे अडल्याचे सूत्रांनी सांगितले. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत बाचाबाची झाली. राणे यांच्या मध्यस्थीने वाद मिटवून आघाडी झाल्याचे जाहीर केले असले, तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे.ज्या आठ जागांवरून शिंदे-आव्हाड यांच्यात जुंपली, त्यामध्ये मुंब्रा, घोडबंदर, वागळे इस्टेट आणि बाळकुम भागातील वॉर्डांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेळीच या जागांबाबत चर्चा करून तडजोड झाली नाही, तर या जागांवर आघाडीत बंडखोरीची लागण लागू शकते, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत आहे.ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसपेक्षा वरचढ असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला ६०-४० जागांचा फॉर्म्युला दिला होता. काँग्रेसने ५५-४५ या फॉर्मुल्याची मागणी केली होती. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने शहरात आघाडी व मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढत अशी आॅफर काँग्रेसला दिली. मात्र, आघाडी करायची असेल, तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करा, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर आघाडीच्या बैठकीत ठाण्याविषयी चर्चा केली. त्या वेळी आघाडीवर उभय पक्षांचे एकमत झाले. या चर्चेची पुढची पायरी म्हणून मुंबईत राणे यांच्या बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी कळीच्या आठ ते नऊ जागांवर दावा केला. मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादी ही काँग्रेसला केवळ ३ जागा देण्यास तयार झाली होती. बरीच चर्चा झाल्यावर आता चार जागा सोडायला राष्ट्रवादी तयार झाली. परंतु, केवळ मुंब्य्राला महत्त्व देण्याची आव्हाडांची ही खेळी असून कळवा, घोडबंदर, बाळकुम, वागळे तसेच शहरातील महत्त्वाच्या प्रभागांतील जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्याचे समजते. सर्वत्र निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने आव्हाड-शिंदे यांच्यात बैठकीत बाचाबाची झाली. ‘आघाडी नाही झाली तरी चालेल, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाणार नाही’, असे काँग्रेसने राष्ट्रवादीला सुनावले.(प्रतिनिधी)
आव्हाड-शिंदे बाचाबाची
By admin | Published: January 22, 2017 5:06 AM