अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेला खंडीचा गुन्हा खोटा असल्याचा दावा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. एफआयआरमध्ये ध चा मा करुन मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे काम तेथील पोलीस उपायुक्त यांनी केले असून त्यांना ते कोणाच्या दबावापुढे असे केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्या पोलीस उपायुक्तांच्या विरोधात वरीष्ठांकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झवेरी बाजार येथील सराफ कार्यालयात येऊन दमदाटी करत पाच कोटींच्या वसुलीसाठी धमकवल्याच्या आरोपावरुन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हा बनाव करण्यात आला असून मला बदनाम करण्याचे काम राजकीय दबावापोटी केले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. वैभव नावाच्या मित्राने फोन करुन त्याला व त्याच्या पत्नीला एकाने डांबून ठेवल्याचे फोनवरुन कळविले होते. एका पार्टनरकडे हिशोब करण्यासाठी आले असल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार त्याला १०१ वर फोन करुन पोलिसांकडे तक्रार करण्यास तसेच मी येतो असेही त्याला सांगितले. त्यानंतर पोलीस आणि मी सुध्दा त्या ठिकाणी पोहचलो. त्याठिकाणी खाली लॉक होता. लॉक तोडून आत गेलो. त्यावेळेस शैलेश जैन यांचा मुलगा त्याठिकाणी होता, त्याला लॉक खोलण्यास सांगितले. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला कानाखाली मारली.
त्यानंतर हे शांत होत नाही तोच माझ्या विरोधात पाच कोटींच्या खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तो माझ्या जिव्हारी लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काही दिवसांपूर्वी वैभव माझ्याकडे आला होता. त्याने सांगितले मी एकाला पाच कोटी दिले होते. तो आता देत नाही, त्यानंतर मुंबईत गेलो असता, त्याने मला संबधीताबरोबर फोन लावून दिला. त्यावेळेस मी त्याला बोलो की, आपको पैसा देना पडेगा, पाच घंटे के लिये पैसा दिया था, नही दिये तो घर आके पैसा ले जाऊंगा, याचे रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. मात्र पोलिसांनी त्यात पैसा नही दिया तो उठा के लेके जाऊंगा असे म्हंटले आहे. याचाच अर्थ एफआयआरमध्ये ध चा मा करुन मला लटकविण्यात आले आहे. त्यात ही घटना १ मे रोजी घडली. त्यानंतर २ तारखेला माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला एवढा वेळ का घेतला गेला असा सवालही त्यांनी केला. मुळात ज्या मुलीला डांबून ठेवण्यात आले होते, त्या प्रकरणाला पोलिसांनी बगल दिली असून त्याविरोधात काहीच अॅक्शन घेण्यात आलेली नाही.