मीरा रोड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मीरा-भाईंदर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून केंद्र आणि राज्य शासनाकडे जमा असलेले ३०० कोटींचे अनुदान महापालिकेस देण्यास राज्य सरकारने टाळाटाळ सुरू केल्याचा आरोप महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महापालिकेने जवळपास १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, राज्य सरकारकडून मात्र अल्प प्रमाणात अनुदान मिळाले आहे. एमएमआरडीएकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यासाठी ४३ कोटी रुपये भरावे लागत आहेत. तर, दरमहा अत्यावश्यक सेवा व सुविधांवर २८ कोटी रुपये इतका खर्च करावा लागत आहे. त्या तुलनेत सध्याच्या परिस्थितीमुळे नवीन इमारतीची बांधकामे बंद असल्याने नवीन परवानगीसाठी विकासक येत नाहीत, जेणेकरून इमारत विकास आकारापोटी अपेक्षा असलेले ८० कोटी रुपये उत्पन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. सरकारकडून प्राप्त होणारे जीएसटीचे १८ कोटींचे अनुदान अपुरे पडत आहे.
केंद्र सरकारकडील जीएसटी उत्पन्न व एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराचे राज्य सरकारकडे जमा झालेले असे एकूण ३०० कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेस तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. परंतु, सरकारने आजही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करत महापौरांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.