कल्याण : डोंबिवलीतील प्रदूषण दूर करण्यासाठी सुरक्षा उपकरणे लावा. कारखान्यांना सुधारण्याची संधी द्या. त्यानंतरही प्रदूषण कमी न झाल्यास कारखान्यांना कुलूप लावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिले. प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यावर ते बोलत होते.
घातक आणि कमी घातक कारखान्यांची वर्गवारी प्रशासनाने करावी. कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: तपासणी करावी, असे त्यांनी बजावले. त्यानंतरही गुलाबी रसायन रस्त्यावर आले, तर कारवाई करा. रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले.रासायनिक कारखाने लोकवस्तीला लागून आहेत. त्यामुळे घातक कारखाने लोकवस्तीपासून लांब नेता येतील का, याची चाचपणी अधिकाऱ्यांनी करावी. यासाठी १५ दिवसांचा अवधी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीसाठी १०० कोटींचा निधी देणार
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते, स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामाकरिता १०० कोटींचा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांनी बैठक घेतली. तिला पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री झाल्यावर मी प्रथमच कल्याण-डोंबिवलीत आलो आहे. येथे सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी माहिती तपासून सरकारकडून आवश्यक निधी दिला जाईल. शहरातील सगळेच रस्ते सिमेंट काँक्रिटचे असलेच पाहिजेत, असे नाही. परंतु रस्ते विकास, शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यात प्रथम १०० कोटींचा निधी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.