भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खांडपे-चिंचवली या ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर ग्रामसेविका श्वेता पाटील यांनी तालुका पोलिसांकडे धाव घेऊन तक्र ार केली असता पोलिसांनी या घटनेची खातरजमा करून १२ नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसह तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांनाही मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील (२८), हेमंत पाडेकर (३१), शरद फोडसे (२८) अशी अटक केलेल्या ग्रामस्थांची नावे असून प्रशांत भोईर, योगेश भोईर, पद्मन पाटील, विनोद डाके, सागर पाडेकर, अशोक भोईर, अमोल पाडेकर, अजय पाटील, विशाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते फरार झाले आहेत.१५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा सरपंच सविता भांबरे यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच गुलाब तारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी झाली. या ग्रामसभेसाठी दोन्ही गावचे एकूण ८५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्या वेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका श्वेता पाटील यांच्यावर ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा आरोप करून चिंचवली-खांडपे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाने कागदोपत्री सर्व योजना राबवल्याचे दाखवले आहे. मात्र, ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणी शुद्धीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या औषधखरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, असे ग्रामस्थांनी आरोप केले. त्यावर ग्रामसेविका पाटील व कर्मचारी निरु त्तर झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकून कार्यालय बंद केले.याबाबत जोपर्यंत गटविकास अधिकारी समाधानकारक कारवाई करत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व घटनेचे काही तरुणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित केले.चित्रीकरण पाहून केली अटकचित्रीकरण ग्रामसेविका पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखवले असता पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, फरार झालेल्या अन्य ग्रामस्थांचा कसून शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.
भिवंडीतील चिंचवली-खांडपे ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:37 PM