अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने दहा कोटी रुपये खर्च करून जे बंदिस्त क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेतले होते ते काम ठेकेदाराने वेळेत पूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदाराला बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलाचे उर्वरित काम करण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या वाढीव निधीची प्रतीक्षा पालिकेला आहे. हा वाढीव निधी आल्यानंतरच निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेल्या बंदिस्त क्रीडा संकुलाचे काम गेल्या वर्षभरापासून थांबवून ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने ते ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाकडे निधीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वाढीव निधी अद्याप मंजूर न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया देखील रखडून राहिली आहे. वाढीव निधी प्राप्त होतात लागलीच निविदा काढली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्या अंतर्गत बंदिस्त क्रीडा संकुलाचे काम केले जाणार होते. मात्र ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे या प्रकल्पासाठी आता वाढीव निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे हा वाढीव निधी शासन कधी मंजूर करते याकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. या क्रीडा संकुलाचे दुसऱ्या टप्प्यात मैदान आणि 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यासाठीच अद्याप वाढीव निधी न मिळाल्याने या क्रीडा संकुलाचे काम धीम्या गतीने पुढे सरकणार हे निश्चित झाले आहे