उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवा लोकार्पणसाठी सज्ज असून बस आगारात २० पैकी ५ बस दाखल झाल्या आहेत. तर येत्या आठवड्यात ५ बसेस दाखल होणार असून तिकिटांच्या दराला मंजुरी मिळाल्यानंतर बससेवा सुरू होण्याची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका परिवहन बससेवा बंद पडल्यानंतर, तब्बल ७ वर्षानंतर आयुक्त अजीज शेख यांच्या प्रयत्नातून परिवहन बस सेवा सुरू होत आहे. महापालिकेने २० बसेस विकत घेतल्या असून केंद्राकडून १०० बसेस येत्या वर्षात दाखल होणार आहेत. सर्व बसेस ई-बसेस असून दोन चार्जिंग स्टेशन महापालिकेने यापूर्वीच उभारले असून दोन चार्जिंग स्टेशन पुन्हा उभारणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी केंद्राकडून ५ कोटीचा निधी महापालिकेला मिळाला असून २० पैकी ५ बसेस महापालिका आगारात दाखल झाल्या. तर ५ बसेस येत्या आठवड्यात दाखल होणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. बस आगार, कर्मचारी, चार्जिंग स्टेशन सज्ज असून शहरातील बसेचा मार्ग निश्चित झाला आहे. आरटीइ संस्थेकडून तिकीट दराला मंजुरी बाकी असून परिवहन बसेस धावण्याला सज्ज झाल्या आहेत.
महापालिका परिवहन बस सेवेच्या ताफ्यात बस येऊन उभ्या असून परिवहन बस सेवेचे केव्हाही लोकार्पण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका परिवहन बससेवा, तालुका क्रीडा संकुल, प्रांत कार्यालयातील प्रशासकीय इमारत, सिंधू भवन आदी वास्तू लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांची तारीख निश्चित झाल्यावर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकार्पण सोहळा होणार आहे. गेल्या महिन्यात १२६ कोटीच्या पाणी पुरवठा टप्पा क्रं-२ च्या योजनेचे भूमिपूजन ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यापूर्वी ४२३ कोटींची भुयार गटार योजना, १५० कोटीच्या निधीतून रस्ते, ४८ कोटीच्या मूलभूत सुखसुविधा निधीतील विकास कामाचे भूमिपूजन झाले होते.
निवडणूकपूर्वी बसेस रस्त्यावरून धावणार
महापालिका परिवहन बसेसेवेच्या ताफ्यात बस दाखल झाल्या असून केंद्र शासनाकडून चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटी आगाऊ निधी मिळाला आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी परिवहन बसेस शहरातील रस्त्यावरून धावणार असल्याचे मत आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले.