अनगाव : ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी रविवारी सुटी असूनही ग्रामसेवक, पाणीपुरवठा अधिकाºयांची तत्काळ बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. तसेच पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामसेवकासह पाणीपुरवठा अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे. तर, सुटीच्या दिवसांतही ते गावपाड्यात फिरून पाहणी करत आहेत. गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत विरोधी पक्षांनी अधिकाºयांना जाब विचारला.‘भिवंडीतील गावे तहानलेली, प्रशासन म्हणते कुठे आहे टंचाई’ या विशेष वृत्तांतर्गत ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने गेल्या रविवारी मांडले. त्यानंतर, तातडीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. शुक्रवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर हंडामोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. तसेच ‘पाणी द्या, कारणे सांगू नका’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर ८ मे पर्यंत पाणीटंचाई दूर करण्याचा अल्टिमेटम गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा उपअभियंता यांना दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.यासाठी गावपाड्यांमधील टंचाईचा अंदाज घेण्यासाठी तेथे पाहणी सुरू असून २७ पाड्यांमध्ये बोअरवेल मारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा उपअभियंता राऊत यांनी सांगितले. तर, उर्वरित गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी बैठक घेऊन पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.पाणीप्रश्नावर जर या पूर्वीच उपाययोजना केल्या असत्या, तर गटविकास अधिकाºयांना सुटीच्या दिवसांत बैठका घेण्याची गरजच भासली नसती. गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत केली नाही, तर त्यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातील, असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिला आहे .‘लोकमत’ने पाण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने त्यावर तोडगा निघाल्याचे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ललित शेळके यांनी सांगितले.
अन् शासकीय यंत्रणा झाल्या खडबडून जाग्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:51 AM