ठाणे : विविध उपक्रमांतून गेले काही दिवस मतदानाबाबत सुरू असलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानाच्या दिवसाआधी किंवा नंतर सुट्ट्या आल्या, तर पर्यटनासाठी बाहेर पडणारा ठाणेकर मतदारराजा या वेळी मात्र मतदानाबाबत चांगलाच जागरूक झालेला आहे. यंदा, मतदानाआधी सलग वीकेण्ड येऊनही मतदारांनी कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केलेले नाही. शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झालेला असला, तरी मतदानाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली जबाबदारीची जाणीव हेच जनजागृतीपर उपक्रमांचे यश आहे.
मतदानाबाबत वेळोवेळी निवडणूक आयोग, शासन आणि विविध संस्थांकडून उपक्रमांद्वारे जागृती केली जाते. तरीही मतदानाबाबत नागरिकांमध्ये निरुत्साह दिसतो. मतदानासाठी काही खाजगी कंपन्या, संस्था तर सुटी जाहीर करतात. मात्र, मतदार तो मतदानाचा दिवस आणि त्यालाच जोडून सुट्या घेऊन पर्यटनासाठी सहकुटुंब बाहेर पडतात, असे चित्र यापूर्वी पाहायला मिळाले आहे. यंदा, ठाणे, मुंबईत आज (सोमवारी) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस बहुतांशी मतदार हे लोणावळा, महाबळेश्वर, शिर्डी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, माथेरान अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनास जातील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, यंदा ठाणेकर मतदारांनी आपल्या मतदानाचे मूल्य ओळखलेले दिसते आहे. त्यांनी मतदानाला महत्त्व देऊन पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. ठाण्यातील बहुतांशी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे या तीन दिवसांत पर्यटनस्थळी जाण्यासाठी फारसे बुकिंग झालेले नाही. जेमतेम पाच ते सात टक्के लोकच बाहेरगावी गेलेले आहेत, असे दिसते. तर, या आधीच्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान झाले, त्यात्या जिल्ह्णात आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक ठाणे, मुंबईकर आवर्जून गेले होते. त्यांनी त्यासाठी बुकिंग केले होते, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिली.
यंदा मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती झालेली आहे. आपलं एक मत मोलाचं आहे, हे ओळखून बहुतांश मतदारांनी आपापल्या शहरात राहणं पसंत केलेलं आहे. मतदान असणाऱ्या आठवड्यात बहुतांशी नागरिक बाहेरगावी जातात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यानुसार, यंदाही ठाणेकर नागरिक पर्यटनस्थळी जातील, असा अंदाज होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे बुकिंग झालेले नाही. मतदारांनी पर्यटनाला न जाता मतदान करण्याला प्राधान्य दिलेले दिसते आहे. आमच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला असला, तरी मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह आहे, याचे समाधान वाटतं. - संतोष भोर, ट्रॅव्हल कंपनीचे प्रमुख