ठाणे : महाराष्ट्रात यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ती आपल्या सर्वांच्या प्रदूषण वाढवणाऱ्या अनेक कृतींमधून झाल्याचे दिसत असून गणपती बाप्पाच्या विसर्जनाची पद्धत काही अंशी याला कारणीभूत ठरते आहे. यावर प्रकाशझोत टाकणारे ‘बाप्पाचे विसर्जन’ या विषयावर रविवारी अभिनय कट्ट्याने पथनाट्य सादर करून विसर्जनाबाबत जनजागृती केली.
अभिनय कट्ट्याचे संस्थापक किरण नाकती यांच्या संकल्पनेतून हे पथनाट्य सादर झाले. करू या रे, करू या रे बाप्पाचे विसर्जन करू या, करू या रे करू या रे नियमांचे पालन करू या रे... असे म्हणत शुभांगी भालेकर, काशिनाथ चव्हाण, न्यूतन लंके, साक्षी महाडिक, ओंकार मराठे, महेश झिरपे, आकाश माने यांनी सादरीकरणाला सुरु वात केली. मूर्तीच्या उंचीमुळे विसर्जनावेळी होणारे अपघात, डीजेच्या कर्कश आवाजामुळे घातकी विद्युत टॉवरकडे लक्ष जात नाही व त्याच्यामुळेच होणाºया अपघातात मंडळाचे कार्यकर्ते मृत्युमुखी पडतात. विसर्जन मिरवणुकीत केमिकलयुक्त गुलालाचा गैरवापर व येताजाता वाहनांमध्ये फेकला जाणारा गुलाल डोळ्यांत जाऊन दृष्टी गमवावी लागते. त्याचप्रमाणे मद्यप्राशन करून मिरवणुकीत बेताल नाच, विसर्जनादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची होणारी दुरवस्था त्यामुळे होणारे जलप्रदूषण, निर्माल्याचे त्याच पात्रात होणारे विसर्जन अशा अनेक गोष्टींमुळे विसर्जनामुळे जे प्रदूषण निर्माण होते, ते ध्वनी, वायू व जलप्रदूषण या सर्वच प्रकारच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम या पथनाट्यातून मांडण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व प्रकार टाळून आपण भक्तिमय प्रसन्न वातावरणात शाडूमातीच्या, तुरटीच्या, लाल मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करावी. तसेच गुलाल उधळण्यापेक्षा कपाळी टिळा लावून गणेशनामाचा जयघोष करून पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची शपथ घेतली. दिव्यांग कला केंद्रामार्फत पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देताना गणपतीचे विसर्जन अभिनय कट्टा येथील उद्यानात लाल मातीच्या एका कुंडीमध्ये करण्यात आले व विसर्जनानंतर काही क्षणातच संपूर्ण गणेशमूर्तीचे रूपांतर लाल मातीत झाले. या गणेशमूर्तीमध्ये तुळशीच्या बिया मूर्ती घडवतानाच पेरल्या होत्या. दिव्यांग कला केंद्राच्या या कुंडीत विसर्जनानंतर काही दिवसांत बाप्पाचे झाड साकारणार आहे.