भिवंडी: समाजात भोंदू बाबांकडून पसरविण्यात येत असलेल्या अंधश्रद्धेला आळा बसावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून बी एन एन महाविद्यालयाच्या केम स्टार सायन्स क्लबच्या वतीने शहरातील जुगीलाल पोद्दार इंग्लिश मेडियम हायस्कूलमध्ये अंधश्रद्धे मागील विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धे मागील तथ्य आणि खोटेपणा या विषयावर प्रात्यक्षिके तसेच नाटक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
सायन्स क्लबच्या १८ स्वयंसेवकांनी नाटक आणि प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेत जळता कापूर तोंडात घेणे, दुधाचे रूपांतर पाण्यात, पाण्यात आग लावणे, लिंबू कापून रक्त काढणे आणि नारळात जादूने आग पेटविणे अशी अनेक जादूचे प्रयोगसादर करून ढोंगी बाबा भोळ्या लोकांना कसे मूर्ख बनवतात हे दाखवले व या जादूमागील शास्त्रही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी बी एन एन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक वाघ यांनी अंधविश्वासामुळे समाजाची होणारी दिशाभूल या विषयावर आपले मत व्यक्त केले. तर पोदार इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या पर्यवेक्षक अनिता चौधरी यांनी अंधविश्वासामुळे स्त्रीयांचे होणारे शोषण या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाप्रसंगी बिएनएन महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना पाटणकर-जैन,प्रा. डॉ. दिलीप काकवीपुरे, प्रा. पुंडलिक वारे, डॉ.चंद्रकांत पाटील यांनी अंधश्रद्धे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.