ठाणे : महाराष्ट्रात यावर्षी पुरमय परिस्थिती निर्माण झाली आहे याची निर्मिती आपल्या सर्वांच्या प्रदूषण वाढवणाऱ्या अनेक कृतींमधून दिसून येते. गणपती बाप्पाच्या विसर्जनाची पद्धत काही अंशी याला कारणीभूत ठरते आहे यावर प्रकाशझोत टाकणारे किरण नाकती यांच्या संकल्पनेतून साकार झालेले पथनाट्य म्हणजेच बाप्पाचे विसर्जन. करुया रे,करुया रे बाप्पाचे विसर्जन करुया रे. करुया रे करुया रे नियमांचे पालन करुया रे असे म्हणत अभिनय कट्ट्याचे कलाकार शुभांगी भालेकर,काशिनाथ चव्हाण,न्यूतन लंके,साक्षी महाडिक,ओंकार मराठे,महेश झिरपे,आकाश माने यांनी अभिनय कट्ट्यावर सादरीकरणाला सुरुवात केली. पथनाट्यात अनेक प्रसंग दाखविण्यात आले .
मूर्तीच्या उंची मुळे विसर्जनावेळी होणारे अपघात, डिजेच्या कर्कश आवाजामुळे घातकी विघुत टॉवर कडे लक्षजात नाही व त्याच्यामुळेच होणाऱ्या अपघातात मंडळाचे कार्यकर्ते मृत्युमुखी पडतात.त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत केमिकलमुक्त गुलालाचा गैरवापर व येता जाता वाहनांमध्ये फेकला जाणारा गुलाल डोळ्यात जाऊन दृष्टी गमवावी लागते त्याचप्रमाणे मद्यप्राशन करून मिरवणुकीत बेताल नाच. विसर्जनादरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांची होणारी दुरवस्था त्यामुळे होणारे जलप्रदूषण. निर्माल्याचे त्याच पात्रात होणारे विसर्जन अशा अनेक गोष्टींमुळे विसर्जनामुळे जे प्रदूषण निर्माण होते ध्वनी,वायू व जलप्रदूषण सर्वच प्रकारच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम या पथनाट्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रकार टाळून आपण भक्तिमय प्रसन्न वातावरणात शाडूमातीच्या,तुरटीच्या, लाल मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी. तसेच गुलाल उधळण्यापेक्षा कपाळी टिळा लावून गणेशनामाचा जयघोष करत पर्यावरण पूरक विसर्जन करण्याची शपथ घेत अभिनय कट्टयातर्फे समस्त नागरिकांना प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन करण्याचे आव्हान अभिनय कट्टयातर्फे करण्यात आले. दिव्यांग कला केंद्राच्या गणेश विसर्जनातून साकारणार बाप्पाचं झाड दिव्यांग कला केंद्र म्हणजे सिंड्रेला या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व ठाण्यातील अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून सुरू करण्यात आलेली दिव्यांग मुलांची आदित्य प्रतिष्ठान, ठाणे व समाज विकास विभाग ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण झालेली एक अनोखी शाळा. प्रत्येक दिव्यांग मुलाची आपल्या अंगीभूत कलेतून स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी याकरिता निस्वार्थीपणे केलेला यशस्वी प्रयत्न. गेल्या तीन वर्षात या दिव्यांग विद्यार्थ्यांकडुन नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कला प्रकारांच्या माध्यमातून आपली कला सादर करून घेतली गेली. संध्या नाकती- प्रमुख , वीणा टिळक -गायन, परेश दळवी-नृत्य या समितीने प्रचंड मेहनत घेतली.
दिव्यांग बंधन, दिवाळी पहाट, बालदिन, आषाढीची वारी ते दिव्यांग मुलांनी अभिनय केलेल्या बालनाट्यापर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम अभिनय कट्टयावर तसेच विविध व्यासपीठावर सादर करण्यात आले. अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या दिव्यांग कला केंद्रा मार्फ़त पुन्हा एकदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. संचालक किरण नाकती यांच्या संकल्पनेतुन दिव्यांग कला केंद्रात सर्व दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी , समाधानासाठी व सोबत या मुलांच्या माध्यमातून आपल्या समाजाला एक महत्वपूर्ण संदेश देण्यासाठी लाल मातीच्या कुंडी गणेशमूर्तीचे आगमन व कुंडी विसर्जन सुरू करण्यात आले.आजच्या प्रदूषित वातावरणात निसर्गाचा ऱ्हास करत आपण सण,उत्सव साजरे करतोय. तसेच नकळतपणे वायु प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण अशा अनेक प्रदूषणाची निर्मिती गणेशोत्सवातसुध्दा आपल्यामार्फत होते. महापुरासारख्या भयंकर घटना दरवर्षी घडत आहेत.अनेक आजारांच्या विळख्यात आपण सापडले आहोत म्हणूनच दिव्यांग कला केन्द्रात लाल मातीच्या गणेशमूर्तीचे आगमन दिव्यांग मुलांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी गणेशोत्सवाची इकोफ्रेंडली आराससुद्धा सर्व दिव्यांग मुलांनी केली. झाडे लावा ,झाडे जगवा हा संदेश देणारा फलक, सभोवताली विविध रोपांच्या कुंड्या, जी रोपं दिव्यांग रोपवाटिकेत याच दिव्यांग मुलांनी लावली होती. तसेच गणेशमूर्तीची रंगरंगोटी सुद्धा याच मुलांनी नैसर्गिक रंगांच्या साहित्यातून केली. औषधी हळद, गंध अशा विविध गोष्टींचा वापर करून मूर्ती रंगविण्यात आली. गुरुजींच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग मुलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. आरती, नैवेद्य सर्वच विधि करून अगदी भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देताना या लाल मातीच्या कुंडी गणपतीचे विसर्जन अभिनय कट्टा येथील उद्यानात एका कुंडीमध्ये करण्यात आले व विसर्जनानंतर काही क्षणातच संपुर्ण गणेशमूर्तीचे रूपांतर लाल मातीत झाले. सर्वात प्रेरणादायी व महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या गणेशमूर्ती मध्ये तूळशीच्या बिया मूर्ती घडवतानाच पेरण्यात आल्या होत्या म्हणजेच दिव्यांग कला केंद्राच्या या कुंडी गणेश विसर्जनातून येणाऱ्या काही दिवसांत साकारणार आहे बाप्पाचं झाड. हे बाप्पाचं झाड भविष्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला सन्मानाप्रीत्यर्थ देण्यात येईल. या विसर्जनातून झाडे लावा व झाडे जगवा हा फक्त संदेश दिला नसून प्रत्यक्ष कृती करण्यात आली आहे. आपल्या तलावांची व नद्यांची परिस्थिती जलप्रदूषणमुक्त करण्यासाठी आगामी काळात दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून बाप्पाचं झाड प्रत्येकाने गणेश विसर्जनातून साकारावे असे आवाहन दिव्यांग कला केंद्र परिवारातर्फे किरण नाकती यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले.