ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व गावे हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्यांची रोज साफसफाई, स्वच्छताविषयक उपक्रम वर्षभर हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी एकमताने घेऊन जिल्ह्यात कामकाजाला प्रारंभही केला आहे. यासाठी सोमवारी स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
जिल्ह्यातील गावखेडी, पाड्यांच्या वस्तीत ग्रामपंचायतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे, कुटुंबस्तरावर कचरा वर्गीकरण, वापरा व फेका प्रकारच्या प्लॅस्टिक वस्तू, पिशव्यांचा वापर न करणे ही स्वच्छतेची कामे आणि त्याबरोबर जनजागृतीची कामे जिल्ह्यात हाती घेतली आहेत. याशिवाय २ ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाव्दारे सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून केले जात आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आता गावात प्लॅस्टिकबंदी घालण्याचा ठराव करण्यात येणार आहे. प्रत्येक गाव हगणदारीमुक्त म्हणजे ‘ओडीएफ पल्स’ करण्याचा ठरावही घेतला जाणार आहे. याशिवाय २ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा केला जाणार आहे. यावेळीही स्वच्छतेची शपथ घेतली जाणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे १५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगवण्याच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहे. स्थायित्व व सुजलाम् अभियानामध्ये १०० दिवसांच्या काळात ग्रामपंचायतींमध्ये १०० शोषखड्डे तयार केले जातील. १९ नोव्हेंबरचा जागतिक शौचालय दिन प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये साजरा होईल. २६ जानेवारी रोजी गावागावातून सायकल रॅली काढून स्वच्छतेची जनजागृती करण्यासह शालेय स्पर्धा, मैला गाळ व्यवस्थापन कार्यशाळा, पदाधिकाऱ्यांचा सरपंचाशी ऑनलाइन संवाद आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले.
--