ठाणे : जिल्ह्यात सध्या एड्स रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असले तरी एड्सला कायमस्वरूपी हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य विभाग मोठ्या तत्परतेने कार्यरत आहे. यास अनुसरून आजच्या जागतिक एड्स दिना निमित्तने येथील सिव्हील रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रक कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महाविद्यालयीन विद्याथ्र्याना एकत्र करून त्यांची ठाणे शहरात एड्स प्रतिबंधात्मक जनजागृती रॅली काढली.
एड्स निर्मूलन मोहिमेत सामाजिक संस्था, नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून, यासाठी मुख्य चौक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. आपला युवा वर्ग हा सृजनशिल असल्याने एड्स निर्मूलन कार्यक्रमात त्यांनी जास्तीतजास्त पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा शलयचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. या जनजागृतीपर रॅलीत डाॅ. पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गंगाधर परांगे, डॉ. धीरज महांगडे, डॉ. निशिकांत रोकडे डॉ.अर्चना पवार, डॉ. चेतना नितील आदींसह विद्यार्थी सहभागी होते.
अति जोखीम गट, रिक्षा टॅक्सी, बस चालक, क्लीनर घरेलू कामगार महिला पुरुष व इतर यांच्याकरिता जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात एच आय व्ही एड्स विषयी माहिती व व्याख्याने आयोजन करणे महत्त्वाचे आहे. असल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमास अनुसरून एड्स विषयावर चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे प्रमुख रतन गाढवे, रविंद्र विशे, अशोक देशमुख, निलिमा पाटील आदींनी परिश्रम घेतले