अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर काही महिन्यांनी अनलॉक झाले, सगळे काही सुरू झाले. शाळा मात्र सुरू होत नसल्याने ‘भय इथले संपवत नाही’ अशा आशयाच्या विडंबनातून राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत याकरिता राजेंद्र शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी स्कूल बसच्या पाठीमागे शाळा सुरू करण्याची मागणी करणारे फलक लावण्यात आले आहेत.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष, संचालक विवेक पंडित म्हणाले, गतवर्षी सगळ्या सोबतच शाळा बंद झाल्या. त्याच्यानंतर जून महिन्यात लोकल सेवा अंशत: सुरू झाली. त्यापाठोपाठ सगळं सुरू झालं, खूप प्रयत्न, पत्रव्यवहार करून अवघ्या १५ दिवसांसाठी शाळा सुरू झाली, पण कोरोनाचे आकडे वाढायला लागल्याने ती बंद करावी लागली. यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे.
त्यामुळे शाळेची भावपूर्ण आठवण झाल्याने ‘आता वर्ष होईल तुला बंद करून’ असे फलकावर ठळकपणे लिहिण्यात आले आहे. मॉल सुरू झाले, रेल्वे वाहतूक सुरू आहे. केवळ शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण अनेकांना मिळण्याची सुविधा नसतानाही कसेबसे सुरू आहे. आता सगळं सगळं सुरू असताना, केवळ शाळा बंद असल्याने ‘भय इथले संपवत नाही’ अशा आशयाचा मजकूर लिहून शाळा सुरू करण्याची मागणी पुढे रेटली आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी हमीपत्र लिहून दिले, पण तरीही केवळ शाळा बंद ठेवल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय तरी शाळा प्रशासनाला घेऊ द्या, असे पंडित यांचे म्हणणे आहे.
------------
वाचली.