ठाणे : मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते. ठाणेकरांनीही शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने एकत्र येत सिंघानिया शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील भिंतींवर चित्र काढून त्याद्वारे मतदान करण्याबाबत जागृती केली. रिमझिम पाऊस सुरू असतानाही चित्र रेखाटण्यासाठी लहान मुलांचा असलेला उत्साही सहभाग वाखाणण्यासारखा होता.
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, ठाणे महापालिका, ठाणे सिटीझन फाउंडेशन यांच्या वतीने मतदारजागृतीसाठी ठाण्यात हा उपक्रम आयोजिला होता. शनिवारी सायंकाळी या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळीच रिमझिम पाऊस सुरू असतानाही शालेय विद्यार्थी तसेच विविध वयोगटातील मंडळींनी चित्र काढण्यासाठी गर्दी केली होती. तर, रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असूनही अनेक विद्यार्थ्यांनी रंगकामाचे साहित्य आणून मतदानाचे महत्त्व पटवून देणारी बोधपर चित्रं रेखाटली.
व्होट टुडे फॉर बेटर टुमारो, आय व्होटेड, तुमचा लढा, तुमचा हक्क, तुमचं मत, पाऊस-ऊन काहीही असू दे, मतदान नक्की करा... अशी घोषवाक्ये व त्याला साजेशी चित्रे रेखाटत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेली ही चित्रे लक्षवेधी ठरत आहेत. या चित्रांचे व या उपक्रमाचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले. यातील सर्वोत्कृष्ट चित्रांना पारितोषिके तर सहभागी प्रत्येकाला प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे सिटिझन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅसबर आॅगस्टिन यांनी दिली.