ठाणे : ठाणे महापालिका एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे वृक्षतोडीला परवानगी देत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत विकासकांच्या २४७ वृक्षतोडीला परवानगी दिली. त्यानंतर आता नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या अर्जानुसार वडपे ते माजिवडानाका रस्ता रु ंदीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार, महापालिका हद्दीत ५१७ वृक्ष तोडली जाणार आहेत. हा प्रस्ताव समितीने रोखून धरला होता. महापालिका हद्दीतील अडीच किमीच्या रस्त्याची शुक्रवारी पाहणी केल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या वृक्षतोडीच्या बदल्यात नव्याने ९७३ वृक्ष लावले जाणार असल्याचे वृक्ष समितीने स्पष्ट केले.
वृक्ष समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत २४७ वृक्षतोडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) अर्जानुसार मौजे वडपे ते माजिवडानाक्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये १२०० च्या आसपास वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी महापालिका हद्दीतील ५१७ वृक्षांचा समावेश आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. त्यावर या वृक्षांचे पुनर्रोपण कुठे केले जाणार, असा सवाल सदस्यांनी केला होता. या रस्त्याची पाहणी केल्याशिवाय परवानगी देणे योग्य ठरणार नसल्याचेही मत सदस्यांनी नोंदवले होते. त्यानुसार शुक्रवारी वृक्ष समिती सदस्य विक्रांत तावडे, नम्रता भोसले, अशरीन राऊत, संगीता पालेकर, वृक्ष प्राधिकरण आणि ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानुसार, बाधित होणाºया वृक्षांमध्ये ५०७ सुबाभूळ वृक्ष आढळले आहेत. तीन आंब्याच्या व काही इतर वृक्षांचाही त्यात समावेश आहे. यात एकही हेरिटेज वृक्ष नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वृक्षांच्या बदल्यात महापालिका हद्दीत ९७३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आता या वृक्षतोडीला परवानगी दिल्याने येथील नॅशनल हायवेच्या आठपदरी रुंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे.