ठाणे - शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अचानक याठिकाणी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. एका कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून अयोध्या पोळ तिथे पोहचल्या होत्या. परंतु कार्यक्रमाठिकाणी कुणीही निमंत्रित नव्हते. हा कार्यक्रमच बनाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर येताच अयोध्या पोळ यांना काही महिलांनी मारहाण केली. अयोध्या पोळ यांना मारहाण आणि शाईफेक कुणी केली याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. परंतु या प्रकारानंतर ठाण्यात ठाकरेविरुद्ध शिंदे गट असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
अयोध्या पोळ सातत्याने सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरतात. अनेकदा आक्रमक शैलीने अयोध्या पोळ यांनी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अयोध्या पोळ यांनी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावरील अयोध्या पोळ यांनी केलेली टीका प्रचंड गाजली होती. त्यावरून संतोष बांगर समर्थकांनी अयोध्या पोळ यांना धमकीही दिल्याचे समोर आले होते.
कळव्याच्या मनिषा नगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात महापुरुषांच्या फोटोला हार घालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेवटी हार का घातला म्हणून या वादाला सुरुवात झाली. त्यावेळी स्थानिक महिला मोठ्या संख्येने होत्या. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून अयोध्या पोळ यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे पुढे आले.