लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आयुर्वेद रथयात्रेला महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात ३५ जिल्ह्यात रथयात्रा नेणे हा पहिला प्रयत्न असला तरी ही सुरुवात आहे. यापुढे जिल्हा जिल्ह्यात रथ नेऊन त्यामार्फत जनजागृती करण्याचा निर्धार ठाण्यातील आयुर्वेद डॉक्टरांनी केला असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले. मंगळवारी ठाण्यात आयुर्वेद रथयात्रा काढण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुलकर्णी बोलत होते.
पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात `आयुर्वेद रथयात्रा' काढण्यात येत आहे. मंगळवारी या रथयात्रेचे ठाण्यातील मानपाडा येथील डॉ. कुलकर्णी यांच्या आरोग्यधाम या आयुर्वेद रुग्णालय परिसरात आगमान झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रथयात्रेचे स्वागत करत ठाण्यातील जनजागृती मोहीमेला शुभेच्छा दिल्या.
पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना) यांचे धुळे हे कर्मस्थान, येत्या ५ जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रातील ३५ जिह्यांत `आयुर्वेद रथयात्रा' काढण्यात येत आहे. २ डिसेंबर रोजी या `आयुर्वेद रथयात्रा'ला तुळजापूर येथून प्रारंभ झाला. आज ठाण्यात आगमन झालेल्या या रथयात्रेचे नियोजन प्रभा आयुर्वेद, आरोग्यधाम, निमा ठाणे, आयुर्वेद संमेलन, आरोग्य भारती, आयुर्वेद व्यासपीठ, लायन्स क्लब या संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी ७.३० वा. या रथयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी एका छोटेखानी कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात येऊन पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना) यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिताली उमरजकर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हा आयुर्वेद रथ ठाणे शहरात फिरण्यासाठी मार्गस्थ झाला.