ठाणे : साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रात दिवंगत बाबुराव अर्थात बाबूजी सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. पत्रकारितेतील सफर, आयुष्यातला संघर्ष आणि आचार्य अत्रेंचे किस्से ऐकावे ते बाबुजींकडूनच, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’ कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार पत्रकार, लेखक तसेच आ. प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव अर्थात ‘बाबूजी’ यांचे ३० नोव्हेंबरला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी श्रद्धांजली सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. आचार्य अत्रे यांच्या सहवासातील बाबूजींच्या आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रात बाबूजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तोंडपाठ असलेले बाबूजी हे नव्या पिढीसाठी आणि पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.१९६० च्या दशकात बाबूजी आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ दैनिकात होते. संयुक्त महाराष्टÑाची चळवळही त्यांनी जवळून पाहिली. विदर्भातील एका छोट्या गावात जन्मलेला माणूस पुढे मुंबईत कामगार चळवळीत स्वत:ला झोकून देतो. साहित्यातही आपली वेगळी ओळख निर्माण करतो. अशा अनेक पैलूंमुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले, अशा शब्दात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्वातंत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले लढवय्या व्यक्तिमत्व म्हणुन बाबुराव सरनाईक यांची ओळख असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंच्या काळाचा साक्षीदार हरपल्याची भावनाही व्यक्त केली. प्राध्यापक, लेखक प्रदीप ढवळ यांनी बाबूजींच्या व्यक्तिगत जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आपल्याला पुस्तक लिहितांना बाबुजींकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल सांगितले.यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. अनिल देसाई, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, आ. सुनील राऊत, रवींद्र फाटक, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, नरेंद्र मेहता, जितेंद्र आव्हाड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, आयुक्त संजीव जयस्वाल, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती आदी मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांनी या वेळी श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्र म सादर केला.
‘साहित्य ते ज्योतिषशास्त्रावर बाबूजींचा ठसा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:51 PM