- जितेंद्र कालेकरठाणे ग्रामीणमधील भार्इंदर येथे पाच महिन्यांचे बाळ चोरण्याची, तर भिवंडीतही एका मुक्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला चोरण्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोन्ही बाळांची सुखरूप सुटका केली. अपत्यसुखाला पारखे झालेल्या महिलांची समाजातून होणारी हेटाळणी तसेच मूल दत्तक घेण्याच्या क्लिष्ट प्रक्रिया आदी कारणांमुळे अनेकदा काही महिलाच अल्पवयीन मुलांचे किंवा नवजात बाळांचे अपहरण करतात. अपत्यसुखाच्या हव्यासापोटी बाळचोरीसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे पाऊल उचलण्यापर्यंत मजल मारली जाते, याची चिंता वाटते.अल्पवयीन मुले किंवा काही तासांच्या नवजात शिशूंना चोरण्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत उघड झाल्या आहेत. यामध्ये पालनपोषण करू न शकल्यामुळे कधीकधी गरीब पालक स्वत:हून आपल्या बाळाच्या विक्रीला तयार होतात. अशी मुले ५० हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत विकली जातात. अनेकदा अशाच चोरलेल्या किंवा घरातून क्षुल्लक कारणास्तव पळून आलेल्या मुलांना हेरून त्यांची विक्री करणारी टोळी सक्रिय असते. ही टोळी या मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करते किंवा अपत्यसुखाला पारखे असलेल्या दाम्पत्याला त्यांची विक्री करते. हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ठाण्यात १७ जुलै २०१४ रोजी चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना झाली. गेल्या पाच वर्षांत या युनिटने तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी कौशल्य पणाला लावून अशा अनेक मुलांचा छडा लावला. चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांचे पथक तर अशाच एका मुलीच्या शोधासाठी गुजरातपर्यंत गेले होते. तिथे या पथकाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. गुजरातमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लग्नासाठी उपवर मुलगी शोधताना वरपित्याची अक्षरश: दमछाक होते. यातूनच मग ज्याला लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल, त्याच कुटुंबातील मुलाशी या मुलीच्या कुटुंबातील मुलानेही लग्न करण्याची अट घातली जाते. (साटेलोटे करणे) अनेकदा हे प्रयोग करूनही उपवर मुलांना मुलीच मिळत नाही. मग, अशावेळी या मुलांचे पालक थेट मुलींची अशा टोळ्यांकडून किंवा गरीब पालकांकडून खरेदी करतात. एका १५ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाच्या तपासातून २०१५ मध्ये याचा उलगडा झाला. या १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा उल्हासनगरमध्ये दाखल झाला होता. तिचा शोध सुरू असतानाच तिने एका व्यक्तीच्या मोबाइलवरून तिच्या आईला फोन केला होता. तिच्या आईच्या संमतीने तिला एका महिलेने फिरायला नेण्याच्या बहाण्याने थेट गुजरातला नेले. तिथे गेल्यानंतर मात्र एका ३८ वर्षीय व्यक्तीबरोबर या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. आता ज्या फोनवरून तिचा आईला फोन आला होता, तो फोन क्रमांक आणि ठिकाण ठाणे पोलिसांनी शोधले. त्यानुसार, संबंधित फोनधारकाचे मुंबईतील कनेक्शन किंवा काही धागेदोरे आहेत का, याचा शोध घेण्यात आला. याच तपासातून उल्हासनगरमधील अशा मुलींची विक्री करणारी दलाल महिला, मुलीशी लग्न करणारा नवरा मुलगा, त्याचा नातेवाईक आणि मुलाचीही नातेवाईक महिला अशा चौघांना अटक केली. या मुलीचे पालक तिला सांभाळण्यास सक्षम नसल्यामुळे तिला त्यावेळी बालसुधारगृहात ठेवले होते. नंतर, तिला पालकांनी घरी नेले. आईच्याच संमतीने या महिलेबरोबर फिरण्यासाठी बाहेर गेली होती. पण, असा प्रकार घडेल, याची कल्पनाही या पालकांना आली नव्हती. थोडे दिवस या पतीबरोबर थांब, नंतर तू पुन्हा तुझ्या घरी जा, असा सल्लाही त्या दलाल महिलेने दिला होता.अन्य एका घटनेमध्ये पश्चिम बंगालमधून मुंब्रा भागात देहविक्रीसाठी आणलेल्या अशाच एका १४ वर्षांच्या मुलीचीही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सुखरूप सुटका केली होती. या मुलीला एका २५ वर्षांच्या मुलाने मुंबईत वेटरचे काम करीत असल्याचे सांगून मुंब्रा भागात आणले होते. चांगली नोकरी असल्यामुळे आपण सुखात राहू, असे आमिष तिला दाखविले होते. पश्चिम बंगालमधून आणलेल्या या मुलीला त्याने मुंब्य्रातील एका दलालाकडे सोपविले होते. या दलालाने तिला डायघर-शीळफाटा येथील एका हॉटेलमध्ये ठेवले होते. ती ज्या हॉटेलमध्ये होती, त्याच हॉटेलमधील एका मुलीने या मुलीच्या वडिलांना फोन करून तिची माहिती दिली. त्याच माहितीच्या आधारे मुलीचा भाऊ आणि वडील तिला शोधत ठाण्यात आले. त्यांनी ठाणे पोलिसांजवळ ही कैफियत मांडली. तेव्हा पोलिसांच्या सूचनेनुसार संबंधित हॉटेलच्या क्रमांकावर संपर्क साधून १४ वर्षांच्या मुलीची मागणी तिच्या भावाने केली. त्यावेळी हॉटेलच्या दलालाने संमती दाखविल्यानंतर ठाणे पोलिसांनी या मुलीसह इतर १६ मुलींची या कुंटणखान्यातून सुखरूप सुटका केली. या मुलीला बांगलादेशातून आणणारा दलाल आणि तिला लग्नाचे आमिष दाखविणारा मुलगा अशा दोघांना अटक करण्यात आली. नंतर, पश्चिम बंगाल पोलिसांनी ठाण्यात येऊन या दोघांना अटक केली.अनेक कारणांमुळे मुले न होणाऱ्यांकडून मुलांची मागणी होते. भीक मागण्यासाठी, बालमजुरी, लग्नासाठी, अनैतिक व्यवसाय किंवा लहान मुलांची अश्लील व्हिडीओग्राफी अशा अनेकविध कारणांमुळे लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटना घडल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. गरिबीमुळे साधारण ५० हजारांपासून ते अगदी पाच लाखांपर्यंतही या मुलांची किंवा मुलींची विक्री केली जाते. त्यामुळेच केंद्र सरकारच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी २०१६ आणि २०१७ मध्ये राबविलेल्या ‘मुस्कान’ आणि ‘बचपन बचाओ’ या मोहिमेंतर्गत एक हजारपेक्षा अधिक मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. यातील बहुतांश मुले घरातून पळून आलेली होती.भरकटलेली लहान मुले एखाद्या अनाथाश्रमात आल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या पालकांचा पत्ता शोधताना मोठी कसरत करावी लागते. ही मुले केवळ खाणाखुणा सांगतात. ठाण्यातील वर्तकनगर येथील एका अनाथाश्रमात एक मुलगी चार ते पाच वर्षे राहिली. ती तिच्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडली होती. तिला पत्ताही सांगता येत नव्हता. केवळ काही खाणाखुणा करून तिने पत्ता सांगितल्यानंतर चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने तिच्या पालकांचा शोध घेतला होता.भार्इंदरमधील घटनेतही हेच सत्य समोर आले. ज्या जोडप्याने पाच महिन्यांचे बाळ चोरले. त्यातील महिलेचे आधी लग्न झाले होते. तिची एकुलती एक मुलगी आणि पतीचेही निधन झाले होते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तिने दुसरे लग्न केले होते. मात्र, तिची आधीच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे तिला पुन्हा अपत्य होणे शक्य नव्हते. त्यासाठी तिने वैद्यकीय इलाजही केले. मात्र, त्यातही तिला अपयश आले. अखेर, पुन्हा अपत्यसुखासाठी तिने भार्इंदर येथे आलेल्या एका महिलेलाच आधी आसरा दिला. नंतर, तिचे हे पाच महिन्यांचे बाळ चोरले. नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्ये कौशल्य पणाला लावून या बाळाची सुखरूप सुटका केली.मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया अवघड आहे. या योजनेतून मुलांना संगोपनासाठी घेणाºया पालकांची आर्थिक कुवत तपासली जाते. पालकांची सामाजिक प्रतिष्ठा तपासली जाते. त्यानंतरही मुले घेण्यासाठी मोठी प्रतीक्षायादी असते. तरीही मुले मिळतीलच, याची शाश्वती नसते. गर्भाशय काम करीत नसेल, अशावेळी सरोगसी हा एक पर्याय आहे. पण, तो महागडा असून त्याचे यशस्वी होण्याचे प्रमाणही अल्प आहे. मग, काही पालक शॉर्टकट पत्करतात. गरीब कुटुंबातील जोडपी थेट अशा बाळांना चोरण्याचा गुन्हा करतात, तर श्रीमंत दाम्पत्य अशा बाळांना चोरणाºया टोळीकडून किंवा गरीब कुटुंबाकडून विकत घेतात, असेही पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.कॅसल मिल येथेही अशाच एका बाळाची विक्री होणार होती. जे विक्री करणार होते, त्यांच्या घरात आधीच तीन ते चार मुले होती. त्यात हे चौथे अपत्य झाल्यामुळे ते सांभाळू शकणार नसल्यामुळे स्वखुशीने गुजरातच्या दाम्पत्याला विक्री करणार होते. हा व्यवहार २०१७ मध्ये कॅसल मिल येथील एका हॉटेलमध्ये झाला. तत्कालीन मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या विक्री करणाºया महिलेला आणि ते बाळ विकत घेणाऱ्यांना अटक केली. मुले विक्री केल्यानंतर कायदेशीर कारवाई होते, याचे काहीच ज्ञान नसल्याचे या पालकांनी विक्री केली.1000 पेक्षा अधिक मुलांचा शोध ‘मुस्कान’ आणि ‘बचपन बचाओ’ या २०१६ -२०१७ मोहिमेंतर्गत अधिक मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते.
बाळांचे सौदागर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:47 PM