उल्हासनगर: कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग क्लिनिक मध्ये बाळाच्या विक्रीचा पर्दापास उघड झाला असून याप्रकरणी क्लिनिकच्या डॉ चित्रा चैनानी, प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली असून रजिस्ट्रेशन रद्द झालेले क्लिनिक सुरू कसे? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग क्लिनिक मध्ये मुलाची विक्री असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे क्राईम ब्रँच यांना दिल्यावर, त्यांनी बनावट ग्राहक पाठवून बाळ विक्रीचा पर्दापास केला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून बाळ विक्रीचे कनेक्शन उल्हासनगर, नाशिक ते कर्नाटक बेळगावला जाऊन पोहचले आहे. याबाबत महापालिकेच्या वैधकीय अधिकारी डॉ अनिता सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, महालक्ष्मी नर्सिंग क्लिनिकचे रजिस्ट्रेशन गेल्या अनेक वर्षांपासून रद्द केल्याची नोंद महापालिका आरोग्य विभागाच्या दप्तरी असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ सपकाळे यांच्या महितीनंतर रजिस्ट्रेशन रद्द असतांना शहरात महालक्ष्मी क्लिनिक सुरू कसे? असा प्रश्न उभा ठाकला. महापालिका आरोग्य विभागाकडे शहरातील क्लिनिक बाबत माहिती नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.
महापालिकेच्या हद्दीतील हॉस्पिटल, क्लिनिक, दवाखाने, लॅबोरेटरी यांच्यावर महापालिका आरोग्य विभागाचे नियंत्रण असते. महापालिका हद्दीतील रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, पॅथॉलॉजी आदीचे सर्वेक्षण, त्यांच्या बैठका महापालिका आरोग्य विभागा मार्फत केले जाते. असे असतांना महालक्ष्मी क्लिनिक सुरू असल्या बाबत महापालिका आरोग्य विभागाने कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीने जोर पकडला आहे. यापूर्वीही डॉ चित्रा चैनानी यांच्यावर बाळ विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे बोलले जात असून डॉ चैनानी यांच्या डिग्रीची चौकशी पोलीस करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांनी दिली.
५ जणांना २३ मे पर्यंत पोलीस कस्टडी नर्सिंग क्लिनिकच्या डॉ चित्रा चैनानी, क्लिनिकच्या प्रतिभा, नाशिक मधील दलाल संगीता वाघ, बाळाची आई गंगादेवी योगी व बेळगाव कर्नाटक येथील दलाल देवान्ना यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने २३ मे पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिली आहे.