कुमार बडदे मुंब्रा : कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती हाताळण्यात व्यस्त असलेल्या सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणेकडून अन्य रुग्णांकडे प्रचंड दुर्लक्ष होत असून, त्याची नवनवी उदाहरणे दिवसागणिक समोर येत आहेत. कळवा आणि मुंब्य्रातील तब्बल चार खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यामुळे एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना मुंब्य्रात घडली आहे.मुंब्य्रातील आनंद कोळीवाडा भागातील ठामपाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला प्रस्तुतीसाठी सोमवारी रात्री कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय नेण्यात येत होते. रुग्णवाहिकेत तिला तीव्र वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तिला मुंब्रा-कळव्यातील चार खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु रु ग्णालयांनी तिला विविध कारणे देऊन दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे खारेगाव परीसरातील एका रु ग्णालयासमोर रुग्णवाहिका उभी करुन दोन परिचारिकांनी मावशीच्या मदतीने रात्री दहा वाजता तिची रुग्णवाहिकेतच प्रसुती केली. रुग्णालयांनी तिला दाखल करुन घेतले नसल्याच्या बाबीला तिचे वडील मो.आसीफ शेख तसेच रुग्णवाहिकेचा चालक तेजस फुलपगार यानी दुजोरा दिला आहे.
रुग्णवाहिकेत दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:26 AM