अंबरनाथ : कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला विश्वासात न घेतल्याचा थेट आरोप अंबरनाथमधील शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर महायुतीत सर्व पक्ष एकदिलाने काम करत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. मनसेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे अशाच भावना व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आम्हाला विश्वासात घेतले नसले, तरी आम्ही मात्र महायुतीचा धर्म पाळत महायुतीला मतदान केले असल्याचंही शिवसेनेचे सुभाष साळुंके म्हणाले.
दुसरीकडे अंबरनाथ शहरातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या महायुतीच्या बुथवरही फक्त भाजपचेच कार्यकर्ते दिसत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फक्त भेट देऊन गेल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत भाजपाचे अंबरनाथमधील पदाधिकारी संजय आदक यांना विचारले असता, त्यांनी मात्र महायुतीत कोणतेही मतभेद नसून सगळे एकत्रपणे एकदिलाने काम करत असल्याचा दावा केला आहे.